 |
राजुल वासा |
राजुल वासा यांच्याकडे अशी विशिष्ट विद्या (concept) आहे, की जिचा उपयोग सर्वत्र झाला तर मेंदुबाधित आजाराचा रुग्ण जगामध्ये एकही राहणार नाही! म्हणजे सर्वच्या सर्व बरे होतील. असे आजार कोणते? तर सेरिब्रल पाल्सी मुले आणि पक्षाघाताने जायबंदी झालेले प्रौढ. ज्या मुलांच्या मेंदूंना गर्भावस्थेत असताना, जन्मताना किंवा जन्मानंतर इजा होते अशी मुले अंधत्वापासून अपंगत्वापर्यंत काहीही व्याधी घेऊन येतात. त्यांना सेरिब्रल पाल्सी मुले म्हणतात. मग त्यांना व त्यांहून अधिक त्यांच्या आईबापांना आयुष्यभर शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागतो. तसेच, ज्या प्रौढांना पक्षाघाताचा अचानक झटका येतो, त्यांच्या हातापायांत, अर्धांगात लकवा येऊ शकतो. मग जगातील सर्व अश्वशक्ती लावली तरी अडकून पडलेला, वाकडा झालेला तो हातपाय सुटत नाही, जीभ लुळी पडलेली तशीच राहते-बोलता येत नाही. त्यांचे आयुष्य परावलंबी होऊन जाते.
राजुल वासा यांच्या मते, मेंदूबाधित आजाराने ग्रस्त असे रोगी जगातील लोकसंख्येच्या दीड टक्का म्हणजे सातशे कोटींपैकी दहा कोटी आहेत. त्यांच्या आजारावर जगात सध्या इलाज नाही आणि ती बालके वा ते प्रौढ परावलंबी, दयनीय जीवन जगत असतात. राजुल वासा यांचा दावा असा आहे, की त्यांच्या उपचारपद्धतीने तसे आजारी लोक पूर्णतः नॉर्मल होतात व सर्वसाधारण, स्वावलंबी जीवन जगू लागतात. त्यांची उपचारपद्धत रोग्याच्या अपंग बाजूच्या शरीराला वापरून त्याच्या मेंदूला ठीक करते. त्यासाठी वासा गुरुत्वाकर्षणाच्या तत्वाचा वापर करतात. मेंदू गुरुत्वाकर्षणाला त्वरित रिअॅक्ट करतो आणि त्याचा फायदा घेत वासा यांनी असाध्य ते साध्य करून दाखवले आहे. त्यात रुग्णाच्या मेंदूतील प्रक्रियेचे नाते त्याच्या अपंग अवयवांशी पुन्हा जोडून दिले जाते. जगात अशा रुग्णांवर मुख्यतः न्यूरॉलॉजी व ऑर्थोपेडिक या शाखांतर्गत उपचार केले जातात, परंतु त्यामधून ते रुग्ण बरे होत नाहीत, त्यांचा विकार-व्याधी दूर होत नाही; फारतर दुःख शमवले जाते – रोगी आयुष्यभर दिव्यांगच राहतो. डॉ.राजुल वासा यांच्या उपचारांनी बऱ्या झालेल्या म्हणून पूर्ववत आयुष्य जगणार्या शेकडो रुग्णांच्या कहाण्या मला माहीत आहेत. मी त्यांची मुंबई व नाशिक येथील उपचार केंद्रे पाहिली आहेत. त्यांची उपचार केंद्रे उत्तर युरोपात फिनलंड व स्वीडनमध्ये आहेत. वासा दरवर्षी किमान एकदा तेथे जात असतात – तेथील वैद्यकीय महाविद्यालयांत वर्ग घेत असतात. फिनलंडचे रोगी उपचारार्थ नासिक केंद्रात येतात. दोन वर्षांपूर्वी फिनलंडचे नऊ डॉक्टर वासा यांची विद्या शिकण्यासाठी नाशिकला येऊन आठ दिवस राहिले होते. एरवी, वासा व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे जगभरातील रुग्णांना सेवा देत असतात. त्या त्यांच्या उपचारपद्धतीवर जगातील नामवंत वैद्यकीय नियतकालिकात लेख लिहिण्यात कोरोनाच्या काळात, सध्या मग्न आहेत.

राजुल वासा त्यांचा उपचार पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून देतात; किंबहुना त्यांच्या ‘राजुल वासा फाऊंडेशन‘चे उद्दिष्टच मुळी जगातील अशा दिव्यांगांचे परावलंबित्व दूर करून त्यांना स्वावलंबी जगण्याची शक्ती प्रदान करण्याचे आहे! त्यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षणानंतर काही काळ व्यवसाय केला व त्यानंतर आयुष्य पूर्णतः रुग्णसेवेसाठी वाहून घेतले आहे. त्या वृत्तीने धार्मिक-आध्यात्मिक आहेत. त्या जैन जीवनपद्धत अनुसरतात व म्हणून त्यांचा मोक्षावर विश्वास आहे. त्या म्हणतात, की मला मोक्ष याच जन्मी मिळावा अशी इच्छा आहे.
त्यांची विनामूल्य मुख्यतः व्यायामावर आधारित उपचारपद्धत सध्याच्या वैद्यक व्यवस्थेस रुचणारी नाही. पण राजुल वासा यांचा दावा असा आहे, की न्यूरॉलॉजी व ऑर्थोपेडिक उपचारांनी रोगी ‘मेंटेन’ केला जातो, त्याला त्याच्या आजारातून मुक्त केले जात नाही. त्यांचा दावा असाही आहे, की त्यांची उपचारपद्धत जगाकडून स्वीकारली जाईल तेव्हा तो एक मोठा व्यवसाय होईल! ज्या अर्थी जगात दहा कोटी रुग्ण आहेत त्याअर्थी तेवढ्यांना उपचार मिळण्याची गरज आहे. त्यांची उपचार कौशल्ये तरुण मुलांनी शिकली तर जगभरच्या दोन-पाच कोटी तरुणांना ते काम मिळू शकेल.
त्यांच्या तोंडचे असे अफाट आकडे ऐकले, की अचंबा वाटतो; पण त्यात तथ्य सूक्ष्म पातळीवर आढळून आले आहे. त्यांचे उपचार घेतलेले किमान अडीचशे रुग्ण तरी पूर्ववत जीवन जगत आहेत आणि पंधरा-वीस तरुण त्यांची व्यायामपद्धत रोग्यांकडून करवून घेण्याच्या कामात गुंतले आहेत. गरज आहे वासा विद्येचा प्रसार होण्याची. वासा म्हणतात, ‘मला ही विद्या निसर्गाने/परमेश्वराने दिली, तोच ती जगापर्यंत पोचवेल’. युरोपमधील डॉक्टर वासा यांच्या पाठीमागे आहेत. भारतामध्येही वासा कन्सेप्ट पसरत आहे. सध्या नाशिक, मुंबई, सोलापूर येथे वासा कन्सेप्ट सेंटर सुरू आहेत. नवीन रुग्णांना ‘राजुल वासा फाऊंडेशन’मध्ये नोंदणी करावी लागते. डॉ.वासा म्हणतात, की एके काळी पाश्चात्य देशातून सर्व ज्ञान भारतात येई पण त्यांनी तो प्रवाह उलट दिशेस फिरवला आहे. ‘वासा कन्सेप्ट‘ भारतातून पाश्चिमात्य देशात पोचला आहे.
————————————————————————————————————-
फारच उपयुक्त कार्य त्यांच्याकडून होत आहे .अशा मुलांच्या आई वडिलांना तर फारच दिलासा देणारी गोष्ट आहे .त्यांच्या कार्यास शुभेच्छा.सौ .अंजली आपटे .
केवढे मोठे काम आहे ! उपचाल पध्दती अभिनव आहे.गागंलसाहेब तुम्ही अशी रत्ने शोधून काढून जगाला माहिती देता याबद्दल तुमचे अभिनंदन. सौ.अनुराधा म्हात्रे.
डॉ राजुल वासा यांनी एक अतिशय वेगळी वाट निवडून महत्वाच्या आणि गंभीर आजाराकडे पाहण्यास जी वेगळी दृष्टी दिली आहे ती परिणामकारक तर आहेच, शिवाय विचार करायला लावणारी आहे. चाकोरीबद्ध उपचारप्रणाली बदलण्यासाठी अशी वेगळी दृष्टी आवश्यक असतेच, पण नुसती दृष्टी असून चालत नाही तर त्यासाठी वेगळी वाट निर्माण करण्याची ताकद असावी लागते. वेगळी वाट असल्यामुळे अडथळे अनेक असू शकतात. प्रस्थापित व्यवस्थेत बदल स्वीकारण्याची मानसिकता अभावानेच आढळते. म्हणूनच डॉ. राजुल वासा यांचे हे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या या प्रयत्नाना जागतिक स्तरावर यश मिळेल असे नक्की वाटते. त्यांना शुभेच्छा
या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद
अद्भुत आणि अप्रतिम… इथले लेख वाचले की दिवाळीतील झगमगाट नं आठवता केवळ आठवतात काही घराजवळ एखादीच पण शांतपणाने अंतर्मुख करणारी ज्योत स्थिर तेवत ठेवणारी पणती…. धन्यवाद