साथ आणि संसर्ग (Mosquito, Corona And infection)

2
59
डॉक्टर अविनाश वैद्य
दादरचे ज्येष्ठ कन्सल्टिंग पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर अविनाश वैद्य अभ्यासू व संशोधक वृत्तीचे गृहस्थ आहेत. त्यांचे मलेरियावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यास ‘मराठी विज्ञान परिषदे’चा पुरस्कार मिळाला, त्यासही आठ वर्षे होऊन गेली. मला ते नावाने परिचित होते. ‘कोरोना’नंतर अचानक कळून आले, की साथ, संसर्ग हेच त्यांचे जिज्ञासेचे विषय आहेत. त्यांच्याशी बोलण्यातून बोलणे वाढत गेले आणि साथी, संसर्ग यांचा इतिहासच उलगडला गेला. शंभर वर्षांपूर्वी जगभर उद्भवलेल्या स्पॅनिश फ्लूपासून सारे विषय समोर आले. त्या साथीमध्ये जगात दीड ते तीन कोटी लोक मरण पावले असे विविध आकडे सांगितले जातात. त्या काळी जगाची लोकसंख्या असेल शंभर कोटींच्या आसपास. अशा तुलना मनात येऊ लागल्या, की कोरोनातील रोगबाधित लोकांची संख्या व मृतांची संख्या याविषयीची धास्ती कमी होऊ लागते. वैद्य यांनी मलेरियासंबंधीचे काम पूर्ण केल्यावर, त्याचे मूळ कारण जो डास त्याचाच शोध घेतला. तर ते म्हणाले, की माझ्यासमोर ग्रीक पुराणकथेतील पंडोराचा पेटाराच उघडला! (Pandora’s Box) एवढासा कीटक पण त्याचे काय प्रताप! त्यांनी ते लेखन इंग्रजीत हातावेगळे केले, पण मराठीत करायचेच राहून गेले आहे व त्यामुळे त्याचे पुस्तकही बनलेले नाही.
          कोरोना विषाणू आल्यावर त्यांना पुन्हा एकदा आव्हान मिळाले. ते म्हणाले, की या विषाणूचे कूळ जगाच्या परिचयाचे आहे, पण त्याचा झपाट्याने होणारा संसर्ग; तसेच, त्याची देशोदेशीची वेगवेगळ्या प्रमाणांतील बाधा कोड्यात टाकून राहिली आहे. त्यात आणखी अमेरिकन प्रोपागंडा. त्यामुळे खरेखोटे चाचपून पाहताना अडचणी येतात. कोरोनाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्याची तीन कारणे असू शकतात – 1. सरकारी गलथानपणा, 2. स्थानिक लोकांची प्रतिकारशक्ती, व 3. विषाणूची स्वतःची आघातक्षमता – ती वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी असू शकते. ते असेही म्हणाले, की इटालीत ज्या प्रमाणात कोरोना पसरला व बाधा करता झाला त्याचेही कोडे वाटत आहे, कारण इटाली हा पाश्चात्य जगामध्ये सर्वात स्वास्थ्यसज्ज देश मानला जातो. त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी, स्टेमसेल उपचारपद्धत या किमया प्रथम साधल्या.
          वैद्य यांना कोरोना रोगाची बाधा आणि घडून आलेले मृत्यू यांचे प्रमाणदेखील कोड्यात टाकते. ते म्हणाले, की हे प्रमाण 3.6 टक्के काढले गेले, ते चीनमधील सरासरीच्या आधारे. भारतात ते आरंभी 2.6 टक्के होते, परंतु सध्या मुंबईत ते सहा टक्क्यांपर्यंत गेले आहे. तो वैद्यक जगाला चिंतेचा विषय आहे. मृत्युप्रमाणात सध्या समाजातील वयोवृद्धांची संख्या हा घटक मानला जात आहे व त्यासाठी कारण त्यांची दुर्बल प्रतिकारक्षमता हे सांगितले जाते.

          वैद्य यांच्या डोक्यात हेच मंथन सतत सुरू असते. ते म्हणाले, डेंग्यु, चिकनगुनिया हे रोग आपल्या पिढीने पाहिले. आम्ही तरुण असताना हत्तीरोग दिसे. तो नाहीसा झाला. त्या सगळ्याचे कारण डास आहे असे मानले गेले. म्हणून तर मी माझ्या त्या लेखनाला ‘डेडलिएस्ट फो (एनेमी) ऑफ मॅनकाइंड’ असे म्हटले आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी इबोला रोगाची साथ आशिया-आफ्रिका खंडांत पसरली होती. तिचे मूळ कोठे हेही कधीच कळले नाही. आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर तेथील काही शहरांत एक विचित्र साथ आली. त्यात रुग्णालयांत एक वर्षापासून ते बारा वर्षांपर्यंतची बालके मरू लागली. ते केवढे मोठे आकडे होते! देशातले सक्षम डॉक्टर तिकडे धावले. ती साथ जशी आली तशी नाहीशी झाली. काही साथी अशा गूढ राहतात. मध्येच, 2004 साली ‘सार्स’ येऊन गेला. त्यात मृत्यूचे प्रमाण दहा-अकरा टक्‍क्‍यांपर्यंत होते. सार्स आणि कोरोना ही सख्खी चुलत भावंडे आहेत. ‘कोरोना’मध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे, परंतु संसर्ग जास्त वेगाने आणि विस्तृत आहे.
        भारतातील वैज्ञानिक अभ्यासकांचे एक वैशिष्ट्य माझ्या ध्यानी येते, की त्यांना येथील तत्त्वज्ञानाबद्दल असलेली उत्सुकता व आस्था. वैद्य हेदेखील त्याला अपवाद नाहीत. ते शंकराचार्य यांचे वाड्मय वाचून ‘वेडे’ झाले होते असे त्यांचे मित्र सांगतात. तो विषय आमच्या बोलण्यात निघालाच ते म्हणाले, रोगास हाताळण्याची भारताची भूमिका त्यामुळे वेगळी दिसते. पाश्चात्य देशांत स्वास्थ्यकारणाइतकेच महत्त्व अर्थकारणास दिले गेले आहे. त्यामुळे तिकडे लॉकडाऊन बऱ्यापैकी सैलसर भासतो. भारतात ‘जान है तो  जहाँ है’ अशी घोषणा दिली गेली आहे. आधी जीविताला जपू या मग जगायचे आहेच. भारतीय लोकांना दारिद्र्यात जगण्याची सवय आहे. अमित वाईकर यांच्या चीनमधील अनुभवपर लेखनातून रोगापासून बचाव आणि सुखस्वास्थ्य या दोन्ही गोष्टी साधता येतात असेही निरीक्षण वैद्य यांनी नोंदले.
डॉ. अविनाश वैद्य 9167272654
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
———————————————————————————————————————

डॉक्टर अविनाश वैद्य यांची पुस्तके 

 

————————————————————————————————————-

2 COMMENTS

  1. छान लेख! Forwarded posts पेक्षा सततच्या चिंतनातून मिळालेली अभ्यासपूर्ण माहिती वाचून खूप आश्वस्त वाटते.वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या प्रमाणाच्या तीन कारणांबद्ल थोडे सविस्तर कळले असते तर बरे झाले असते.भारतियांच्या प्रतिकारक्षमता इतर देशातील विशेषतः अमेरिकेतील लोकांपेक्षा चांगली असण्याचे कारण म्हणजे तिथे आजार निर्माण करणाऱ्या घटकांपासून लोक चार कोस दूर राहतात आणि आजारी पडल्यावर लक्षणांना लगेच 'fix' करतात त्यामुळे प्रतिकारशक्ती develope होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here