वडसा (देसाईगंज) – द झाडीवूड! (WADSA – The Jhadistage)

14
64

 

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे शहर अलिकडे झाडीवूड म्हणून नावारूपास येत आहे. मुंबईला जसे बॉलिवूड’, तसे विदर्भाच्या झाडीपट्टीतील वडसा हे झाडीवूड’. बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तर झाडीवूड मात्र नाटकांसाठी. झाडी नाटकांचा सीझन चार-पाच महिन्यांचा असतो – नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च. तरीदेखील तेथे पन्नास-साठ नाटक कंपन्या आहेत. जवळपास पाचशे पुरूष कलावंत तर अडीचशे स्त्री कलावंत आणि संगीतसाथ करणारे दोनशे कलावंत. पडद्यामागील नेपथ्यध्वनी व प्रकाशयोजना साकारणारे, मंडप बांधकाम-डेकोरेशन करणारे शे-पाचशे कारागीर अशा दीडएक हजार लोकांची चूल झाडी नाट्यव्यवसायावर पेटवली जाते. पाचसात हजार लोकवस्तीच्या गावी हा चमत्कारच म्हणायचा! झाडीपट्टीत गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया हे चार जिल्हे मुख्यत: येतात. तेथे नाट्यप्रयोगगावोगावी होतात आणि नाटकांना प्रेक्षकवर्ग येतो तो दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून. वडसा हे झाडीपट्टीतील व्यावसायिक नाटकांचे मुख्य केंद्र गेल्या तीस चाळीस वर्षांत बनले आहे.

वडसा येथे रंगवैभव रंगभूमीवर मकरंद अनासपुरे

झाडीवूडने पुण्या-मुंबईच्या प्रसिद्ध सिने-नाट्यकलावंतांना देखील भुरळ घातली आहे. त्यामुळे मोहन जोशीमकरंद अनासपुरे, दीपक शिर्केरमेश भाटकरअरूण नलावडे यांच्यासारखे सिनेनट सीझनमध्ये महिना-पंधरा दिवस वडसा येथे येऊन राहतात व ‘झाडी नाटक’ करतात. म्हणूनच त्यास बॉलिवूडच्या धर्तीवर झाडीवूड म्हणतातपुण्या-मुंबईची मंडळी वडसा येथे रूम भाडेतत्त्वावर घेऊन राहतात. नागपूर किंवा इतर लांबची कलावंत मंडळीसुद्धा तेथेच भाड्याने एकत्र किंवा स्वतंत्र राहतात. मोहन जोशी वगैरे अनिल नाकतोडे या प्रसिद्ध झाडी अभिनेत्याच्या घरी, उदापूरला राहत. रमेश भाटकरमकरंद अनासपुरे हॉटेलवर थांबतात. भाटकर आता हयात नाहीत. आणखीही काही सिनेनटांनी झाडीवूडच्या रंगभूमीवर अभिनयासाठी हजेरी लावली आहे. परंतु सिनेनट्यांनी मात्र तिकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वर्षा उसगावकर, माहेरची साडीफेम अलका कुबल ह्या नाटकांच्या उद्घाटनासाठी फक्त येऊन गेल्या आहेत. त्यांना पाहण्यासाठी रसिकांनी अफाट गर्दी केली होती! झाडीपट्टीच्या बाहेरून येणारे कलावंत नाटकाच्या आधी एक दिवस येतात आणि स्थानिक कलाकारांबरोबर तालीम करतात. त्यांना नाट्यसंहिता निर्मात्याकडून आधीच पाठवली जाते.

वडसा येथे पन्नास ते साठ व्यावसायिक नाटक कंपन्या सक्रिय आहेत. दुसऱ्या बाजूस झाडीच्या गावागावांत दुर्गा मंडळ, गणेश मंडळ, युवा मंडळ, रमाई मंडळ, पंचशील मंडळ अशी हौशी मंडळे आहेत. ती त्यांच्या इतर उपक्रमांबरोबर व्यावसायिक कंपन्यांच्या नाटकांचे आयोजनही करत असतात. तेही त्यांच्या उत्पन्नाचे साधन असते. प्रत्येक गावी वर्षभरात नाटकाचे एकाददोन कार्यक्रम होतात. मंडळ नाटकाच्या निर्मात्यास चाळीस ते साठ हजार रूपयांपर्यंत ठरावीक रक्कम देते. त्या पैशांत निर्माता मंडळास नाटकाचे दोन बॅनर, चारशे पॅम्फलेटस्, शंभर मानपत्रे आणि दोन हजार तिकिटे पुरवतो. शिवाय निर्माता मंडप, डेकोरेशन, नेपथ्य, संगीत आणि नाट्य कलावंत इत्यादी उपलब्ध करून देतो. आयोजक मंडळ परिसरातील गावांमध्ये जाऊन नाटकाची जाहिरात करते. त्यासाठी मोबाईल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा आधुनिक साधनांचा वापर करते. नातेवाईक, मित्रमंडळी असे त्यांचे स्वतःचे नेटवर्क असते ते वेगळेच. नाट्यप्रयोगाच्या दिवशी दिवसभर भोंगे लावून नाटकाची जाहिरात करणारी रिक्षा शेजारच्या गावा गावांमध्ये फिरवली जाते.

एक टप्पा आऊट मालिकेतील कलावंत श्रीवल्लभ भट आणि इतर

सहसा मंडळांकडून नाटकांचे आयोजन काहीतरी, निमित्त साधून केले जाते. बैलांचे इनामी शंकरपट हे त्यासाठी हमखास निमित्त असे. पण आता बैलांच्या शर्यती कायद्याने बंद झाल्या. परंतु मंडई (मंडई म्हणजे ठरवून घेतलेला बाजार. पण त्याला जत्रेचे स्वरूप असते), कीर्तन सप्ताह काला, कोणा थोर पुरुषाची जयंती, सण-उत्सव, जत्रा अशी निमित्ते असतातच. त्यामुळे माणसांची गर्दी पूर्वीपासूनच होई. तेथे दंडारसारखे स्थानिक लोकनाट्याचे प्रयोग होत. ती मोठीच करमणूक असे. आता तेथ विविध मनोरंजनाची नाटके केली जातात. पण लोकांना या नाटकाचे वेड इतके लागून गेले आहे, की आता निमित्त नसले तरी नाटके होत राहतात. काही गावी, दरवर्षी त्याच तारखेला नाटक आयोजित करायचे असेही ठरवले गेलेले आहे. उदाहरणार्थ पिंपळगाव भोसले येथे 30 नोव्हेंबर, उदापूरला (चंद्रपूर) 16 जानेवारी, रेंगेपार (भंडारा) येथे वसंत पंचमीला हे प्रयोग ठरलेले असतात. उदापूरमध्ये, माझ्या गावी इनामी शंकरपटाचे आयोजन दरवर्षी 16 जानेवारीला होत असे. त्या निमित्ताने तेथे नाटक हे समीकरण ठरून गेले होते. आता शंकरपट बंद झाले असले तरी नाट्य परंपरा चालू आहे! इतके लोकांना नाटकवेड लागून गेले आहे. गावात एका रात्री लाखाची उलाढाल होते. हरवलेला माणूस गर्दीत शोधणे त्या रात्री कठीणच! गावात प्रत्येकाच्या घरी अधिकचे जेवण बनवून ठेवलेले असते. कोण कोणाच्या घरी पाहुणा आला हेही कळण्यास मार्ग नसतो. यानिमित्ताने लग्नाच्या वाटाघाटी, मुलीला दाखवणे असेही कार्यक्रम उरकून घेतले जातात. माणसे नाटकांसाठी कोसो दूर प्रवास करतात. रात्ररात्र जागतात.

नाटकाचे संगीत संयोजन करणारी मंडळी आणि उपस्थित रसिकांची गर्दी

नाटक तीन तासांचे नसते, रात्री दहा-साडेदहाला सुरू झालेले नाटक पहाटे साडेचार-पाचलाच संपते. नाटकात नृत्य, लावण्या, गीत, प्रत्येक अंकानंतर रेकॉर्डिंग, डान्स असा मसाला भरपूर असतो. त्यामुळे रसिकांना ते सारे मनापासून आवडते. नाटकास हजारो प्रेक्षक येतात. गावातील प्रत्येकाच्या घरी पाच-दहा पाहुणे नाटकाच्या दिवशी जमतात. नाटक जर तीन तासांत संपले तर तेवढ्या पाहुण्यांना घरी झोपण्याची अडचण होईल! त्यात नाटकांचा हंगाम म्हणजे कुडकुडत्या थंडीचे दिवस. म्हणून नाटक आयोजक मंडळे निर्मात्यांकडे पहाटे पाचपर्यंत चालणाऱ्या नाटकाची मागणी करतात. मग प्रेक्षकांकडून सहकुटुंब सहपरिवार असा नाटकाचा आस्वाद घेतला जातो. जुनी गोष्ट आहे. एकदा कुरूड या गावात रमेश भाटकर यांचे षड् यंत्र आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बिघडले स्वर्गाचे दारह्या दोन नाटकांचे प्रयोग होते. योगायोग असा, की दोन्ही प्रयोग रात्री दोनच्या बेतास संपले. पाहुण्यांची झाली पंचाइत, आता करायचे काय? पण त्यावेळी गावात एकाच रात्री नऊ कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मग काय? ती दोन्ही नाटके बघण्यास गेलेल्या रसिकांना पुन्हा दुसरे तिकिट काढून मिळेल त्या थिएटरमध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्यांच्या खिशाला दुहेरी तिकिटांची कात्री बसली. काय करणार? रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत थंडीत कुडकुडत कसे बसणार? कुरूड गावचे नऊ कार्यक्रम ही झाडीपट्टीतील वेगळीच गंमत आहे. मोहल्ल्या मोहल्ल्यांतील तरूण मुले असे वेगळे कार्यक्रम रात्रभर करत असतात. लोक तेही तिकिट काढून पाहतात.

नाट्यनिर्माता ज्या बॅनरखाली नाटकांची निर्मिती करतो त्याला झाडीपट्टीत प्रेस किंवा कंपनी म्हणतात. उदाहरणार्थ येथे महाराष्ट्र कला रंगभूमीला प्रेस/कंपनी म्हणतात. साधारणतः एका प्रेसचा एकच ग्रूप असतो. ग्रूप म्हणजे नटनट्यांचा एक संच व त्यांनी बसवलेले नाटक. संच वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करू शकतो. एका ग्रूपमध्ये सात पुरूष आणि चार स्त्री कलाकार असलेले नाटक सध्या झाडीपट्टीमध्ये चालते. काही वेळा सात पुरूष, चार स्त्रिया आणि बालकलावंत अशी नाट्यसंहिता असलेले प्रयोगही सादर होतात. महाराष्ट्र रंगभूमीतर्फे एका वेळी दोन ग्रूप दोन नाटकांचे दोन प्रयोग चालवायचेआता फक्त स्व.धनंजय स्मृती कला रंगभूमीच दोन ग्रूप चालवताना दिसते. एक गट हा नामांकित कलावंतांचा असतो. त्यांचे जास्त प्रयोग लागतात. दुसऱ्या गटात काही कलावंत नवखे असतात.

नाटकांचे बरेच निर्माते हे वडसाचे आहेत, चंद्रपूरसिंदेवाहीब्रह्मपुरीसाकोली, अर्जुनी, गडचिरोली येथेही काही ग्रूप त्यांची दुकाने लावून बसलेले आहेत. गावोगावच्या नाट्यप्रयोगांची बुकिंग करण्यास येणारे मंडळ कार्यकर्ते चारी जिल्ह्यांतून वडसालाच येतात. म्हणून बऱ्याच निर्मात्यांनी वडसा गावात कार्यालये उघडली आहेत. वडसा-लाखांदूर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा लावलेले नाटकांचे रंगारंग होर्डिंग लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.

नाटकाची जाहिरात

प्रयोगाच्या दिवशी सर्व कलावंत मंडळी त्यांना दिलेल्या वेळी प्रयोगाच्या ठिकाणी पोचतात. ते बंधनकारक असते. साधारणतः प्रयोग असलेले गाव हे वडसा कार्यालयापासून किती अंतरावर आहे, तेथे पोचण्यास किती वेळ लागू शकतो हे बघून दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान कलावंत आणि संगीतकार यांचे वाहन वडसाहून निघते. स्टेज सजावट, मंडप डेकोरेशन, साऊंड सर्विस सकाळीच नाटकाच्या गावात पोचलेले असतात. ते नाटकासाठी रंगमंच तयार करून ठेवतात. एका सीझनला उदापूर गावात पाहिजे तेवढा पाहुण्यांचा राबता दिसत नव्हता. कारण दरवर्षी होणारे शंकरपट बंद झाले होते. तरीही गावात दोन नाटकांचे आयोजन केले होते. मंडळांचे सदस्य नाटकांची बुकिंग होणार की नाही या विवंचनेत होते. रात्री आठ-साडेआठ वाजेपर्यंत एकही तिकिट कटले नाही. मंडळ कार्यकर्त्यांना पैसा निघणार की नाही ही चिंता सतावत होती. पण नंतर मात्र दहा वाजेपर्यंत दोन्ही थिएटर हाऊसफुल्ल झाले. दोन्ही बाजूंला प्रत्येकी पन्नास-साठ हजारांचे बुकिंग झाले होते आणि मंडळांचा पूर्णतः विश्वास बसला की नाटक हे शंकरपटावर अवलंबून नसून जनतेच्या रसिकतेवर अवलंबून आहे. झाडीची माणसे खरेच नाट्यवेडी आहेत!

निर्मात्याचे अर्थकारण साधारण असे असते- एका निर्मात्याकडे मुख्य पात्रे करणारे सात पुरूष (त्यांचे मानधन एका प्रयोगाचे एक हजार ते सात हजार आणि सिनेकलावंतांना पंधरा ते पंचवीस हजार), चार स्त्री कलावंत (दोन हजार ते बारा हजार प्रती प्रयोग) असतात. लेखक असतो. दोन विंगांत दोन पार्श्वसूचक (प्रॉम्प्टर) असतात. एका नाटकाचे चार प्रयोग झाले, की पार्श्वसूचकाचे काम कमी होते. पण त्यांना मानधन सुरू राहते, कारण त्यांना सुट्टी दिल्यास ते पुन्हा येत नाहीत. पुढील वेळी नवा गडी शोधणे म्हणजे कठीण काम असते. एक तबला, एक ऑर्गन आणि एक ऑक्टोप्याड वादक मिळून तिघांचा संगीतकार गट असतो. नेपथ्याचे साहित्य पुरवणारी तीन माणसेरंगकाम करणारे दोन, मंडप तयार करणारे जवळपास दहा-बारा आणि ध्वनी व प्रकाशयोजना सांभाळणारे एक-एक नाट्यकर्मी असतात. ही कलाकार व कारागीर माणसे केवळ नाटकांतून मिळणाऱ्या मिळकतीवर अवलंबून नाहीत. ते शेती आणि त्यावर आधारित मोलमजुरी किंवा इतर कामे करून चरितार्थ भागवतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यात लग्नाचा सीजन चालू होतो. तेथे डेकोरेशनवाले काम करतात. गायनाच्या कार्यक्रमात संगीतकार मंडळी असतात. नाटक ही अधिकतर हौस असते, पण निर्मात्यांचा मात्र तो व्यवसाय असतो. नाट्यनिर्मात्यास प्रत्येक प्रयोगास साधारण दहा हजार रुपये मिळतात. तीस वर्षांआधी टिपू सुलतान या नाटकात जिवंत घोडा स्टेजवर बघायला अफाट गर्दी झालेली होती. त्या वेळी मंडळाला निव्वळ नफा लाख-सव्वा लाख रुपये झाला होता. त्यातूनच पिंपळगाव भोसले येथील दुर्गामंदिर आणि जेठूजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

टीप – उदापूरची शंकरपट परिसरात नावाजलेली होती. शंकरपट म्हणजे बैलांची धावण्याची शर्यत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्ह्यांतील जोड्या शर्यतीसाठी पटाच्या दानीवर उतरायच्या. पटाची जोडी म्हणजे खास शर्यतीकरता राखून ठेवलेलीपोसलेली बैलजोडी. सामान्य कामकरी बैलांपेक्षा त्यांच्यासाठी खाण्याचा खास रतीब ठेवला जातो. ती बैलजोडी बैलगाडीसारख्याच पण आकाराने लहान व हलक्या अशा ’छकडा’ नावाच्या साधनाला जुंपतात. त्यात स्त्रियासुद्धा हिरिरीने भाग घेतात. बैल पळवण्याच्या नादात त्यांना अमानुषपणे तुतारीने ढोसलेही जाई, सोबत सट्टेबाजीही चालायची. हल्ली तो प्रकार कायद्याने बंद झाला.

– रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com

रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते  विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ठिगळ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी आक्रीत, पाऊसपाणी आणि हा जीव तुझ्यावर जडला या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात.

———————————————————————————————-———————————————————

 

————————————————————————————————————————————————-

14 COMMENTS

  1. छान लेख.नाट्यवेडी माणसे सर्व महाराष्ट्रात आढळतात.

  2. आमची झाडीपट्टी आणि इथले लिखाण आणि कलावन्त दर्जेदार आहेत आणि झाडीपट्टी ला दिलेलं झाडीवूड हे नाव देखील शोभेसे आहेमी देखील कवियत्री, लेखिका आणि शॉर्ट फिल्म चे काही story लिहिल्या आहेत जर आम्हालाही संधी दर्जेदार मिडाली तर नक्कीच आम्हीही झाडीवूड असे म्हणू

  3. नक्कीच दखल घेतली जाते. आपण लेखिका आहात .दर्जेदार लेखणीची निश्चितच दखल घेतली जाते.

  4. लेख वाचून झाडीपट्टीत जायलाच हवे असे मनात आले. गांगल सरांचे आभार. बलुतं पासून ते झाडीपट्टीपर्यंत काय काय विषय शोधून ते वाचकांसमोर मांडतात याला तोड नाही.

  5. खरं आहे ..आपण झाडीपट्टी बघायलाच हवी. साहेब धन्यवाद ..मा. गांगल साहेबांचे मनापासूनआभार

  6. आम्हा कलावंताची कर्मभूमी झाडीपट्टी वडसा 🙏🙏 सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here