झाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे दर्शन (Remnants of Palace’s Show History of Zadipatti – East Vidarbh)

8
62

 

अंजोरा येथील बहेकार वाडा

झाडीपट्टी म्हणजे पूर्व विदर्भ. जुन्या सी.पी. ॲण्ड बेरार प्रांतामधील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे; तथा सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा मौदा-रामटेककडील काही भाग त्यात येतो. मध्यप्रदेशातील बालाघाट व शिवनी हे जिल्हेदेखील झाडीपट्टीत समाविष्ट होतात. राज्यवार भौगोलिक विभागणी 1956 च्या एकभाषिक राज्य निर्मितीनंतर (भाषावार प्रांतरचनेनंतर) झाली. झाडीपट्टीचे वैशिष्ट्य असे, की हा भूभाग त्याचे ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक आगळेवेगळे अस्तित्व त्या बदललेल्या परिस्थितीतही टिकवून आहे.

तिरखेड येथील हवेली (वाडा)

झाडीपट्टीत नजरेत भरतात ते तेथील पोवार, कुणबी आणि लोधी समाजाचे भव्य वाडे. पोवार समाजाच्या ऐतिहासिकतेबद्दल असे सांगता येईल, की राजा विक्रमादित्य ते (माळवा) धार नगरीचे राजे चक्रवर्ती राजा भोज हे पोवार समाजाचे पूर्वज होत. पोवार मंडळींनी राजा भोज यांच्यानंतर काही कौटुंबिक तर काही विस्तारप्रवृत्तीच्या कारणांनी नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे त्यांनी त्यांचे राज्य स्थापन केले. इस्लामिक आक्रमणाचा धोका त्यांना होताच. ते त्यांची संस्कृती व समाज वाचवण्याच्या प्रयत्नात सरकत सरकत वैनगंगेच्या सुपीक परिसरात (तत्कालीन भंडारा, बालाघाट, सिवनी जिल्ह्यांत) येऊन स्थायिक झाले. त्यांचे मराठ्यांना युद्धात साह्यही वेळोवेळी झाले. मात्र नंतर इंग्रजी अंमलात युद्धे संपून गेली आणि अखेर पोवार मंडळी तेथील सुपीक जमिनीचे मेहनती शेतकरी होऊन गेले. तलवारबाज योद्धे ते शेतकरी असा पोवार समाजाचा इतिहास आहे! पोवारवंशीय राजांच्या लढवय्या सरदारांनी नागपूरच्या भोसल्यांना 1750 सालच्या कटक युद्धात विजय मिळवून दिला. तेव्हा त्याप्रीत्यर्थ त्यांना झाडीपट्टीतील वैनगंगा आणि वाघ नदीच्या सुपीक प्रदेशात मालगुजारी, जमीनदारी व पाटीलकी देऊन (नागपूरच्या भोसल्यांद्वारेच) वसवण्यात आले. भोसल्यांनी गणूजी कटरे (जमीनदार) यांना तिरखेडी येथील जमीनदारी दिल्याची नोंद 1751 साली सापडते. पोवार समाजात कटरे यांना कदाचित प्राथम्याचे स्थान असावे. कारण पूर्वी जातपंचायतीमध्ये कटरे यांची उपस्थिती आणि त्यांनी दिलेल्या निर्णयांना अंतिम महत्त्व होते. असे असले तरी त्या भागात स्थलांतरित झालेल्या पोवार समाजात एकूण छत्तीस कूर/आडनावे (Surnames) असून ते सर्व एक से बढकर एक शूर लढवय्ये म्हणून प्रसिद्ध होते. विशेषतः बिसेन, पटले, ठाकूर असे काही परिवार शूरतेसाठी प्रसिद्ध असल्याचे दाखले मिळतात. ती सर्व छत्तीस कूर/आडनावे (Surnames) भंडारा जिल्ह्यात सर्वत्र आढळतात. पण झाडीपट्टीतील वाड्यांमध्ये अभ्यास करताना कटरे यांचेच वाडे अधिक असल्याचे दिसून येते.

त्यावेळी कुणबी समाजाचे लढवय्ये जमीनदार/मालगुजार त्या भागातील कामठा-आमगाव परिसरात तर लोधी समाजाचे लढवय्ये जमीनदार हिरडामाली येथे अस्तित्वात होते. त्या मूळच्या योद्ध्यांनी हाती नांगर इंग्रजांची सत्ता येता येता, धरला आणि त्यांचा स्वत:चा जम त्या सुपीक जमीन परिसरात बसवला. इंग्रजांनीसुद्धा पोवार समाजातील माजी लढवय्ये सरदारांना जमीनदारी दिली (1815). इंग्रजांद्वारे तिरखेडीच्या कटरे यांना जमीनदारीने गौरवण्यात आल्याचे व त्यांची जमीनदारी कायम करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुणबी व पोवार समाजांतील जमीनदार, मालगुजार पाटलांनी शेतीव्यवसायासाठी आवश्यक असलेले वाडे तेथे बांधले. वाडे कसले किल्लेच होते ते! पोवार व कुणबी समाजाचे वाडे प्रामुख्याने तिरखेडी, गोर्रे, लोहारा, महागाव, जामखारी, लावणी-फुटारा, आमगाव, वळद, फुक्कीमेटा, कामठा, बोरकन्हार, डोंगरगाव (सावली) येथे आहेत. त्याशिवाय आणखी काही प्रसिद्ध वाडे आहेत. उदाहरणार्थ तिरखेडी येथील कटरे यांचा वाडा. तिरखेडी हे गाव जरासे आडवळणाला असून, ते गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा या आदिवासी व वन्यबहुल तालुक्यात येते. खुद्द सालेकसा हे तालुक्याचे गाव मुंबई-हावडा रेल्वेलाईनवरील एक स्टेशन आहे. तिरखेडी हे गाव सालेकसा स्टेशनपासून तीन-चार किलोमीटरवर येते.

बोरकन्हार येथील वाड्याच्या आतील भाग

तिरखेडी येथील कटरेवाडा पाचमजली होता, सध्या त्यांची पडझड झाली आहे. त्या वाड्याचा परिसर सहा-सात एकरांत पसरलेला आहे. वाड्यात प्रवेश करण्यासाठी तीन विशाल दरवाजे होते. त्यांपैकी एका दरवाज्याला हत्ती दरवाजा असे म्हटले जात असे, कारण की तिरखेडीच्या कटरे जमीनदारांनी हत्ती पोसला होता. त्या हत्तीचे आवागमन त्या दरवाज्यातून होत असे. हत्तीची गरज इंग्रजांच्या आगमनानंतर, युद्धासाठी राहिली नव्हती. त्यामुळे हत्ती शोभेसाठीच जणू पोसला जात होता. हत्तींविषयीची एक मजेदार हकिकत अशी आहे, की मागील पिढीतील जमीनदार झुम्मकलालजी कटरे यांचे लग्न 1943-44 च्या दरम्यान बालाघाट येथील पोवार समाजातील एकमात्र रायबहादूर आणि सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर ऑफ अॅग्रिकल्चर (तत्कालीन छत्तीसगढ संभाग) टुंडीलाल पोवार तुरकर यांच्या ज्येष्ठ कन्येशी झाले. तेव्हा तिरखेडीतून निघालेल्या वरातीमध्ये नवरदेव झुम्मकलालजी हे हत्तीवर बसून गेले होते!

वाडा पाच मजली होता. त्यात एका मजल्यावर संभाव्य हमल्याला तोंड देण्यासाठी बंदुकधारी पहारेकरी (सैनिक) यांच्यासाठी व्यवस्था होती. खालील मजल्यात कचेरी(!) होती. शिवाय, एक तळघर असून त्यात संपत्तीठेवली/साठवली जात असे. वाड्याच्या भिंती मातीच्या असून पायव्याच्या ठिकाणी भिंतींची जाडी पाच फूटांपर्यंत आहे. ती जाडी वरील मजल्यावर दोन फूटांपर्यंत कमी होते. वाड्याची पडझड झाली असली तरी जुन्या वैभवाच्या खाणाखुणा सहज ओळखता येतील. वाड्याच्या सर्व मजल्यांची व तेथील खोल्यांची झाडफूक रोजच्या रोज होत नसल्याने आमच्या वाड्यात न झाडलेल्या गुह्य (?) जागासुद्धा असतात असा भलताच तोरा (!) सुद्धा मिरवला जात असे.

बोरकन्हार येथील वाडा व जोडणी

काही वाडे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार या गावातही आहेत. त्या गावातील वाडे व एकमात्र हवेली भव्य नसली तरी त्या वास्तू झाडीपट्टीतील वाडा-संस्कृतीचे रूप समजून घेण्यासाठी मदतशील ठरू शकणाऱ्या आहेत. गावातील दिवंगत पोलिस पाटील मोहनलाल कटरे यांचा वाडा सुमारे अर्धा-पाऊण एकरांच्या परिसरात आहे. वाडा गावाच्या मध्यभागी असला तरी त्याची ठेवण गावापासून अगदी अलग वाटावी अशी आहे. गावातील एक गल्ली त्या वाड्यात जाऊनच संपत असल्याने पहिल्यांदा त्या वाड्यात प्रवेश करणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो! वाड्याच्या माजघरात धान साठवण्यासाठी असलेल्या ढोलीच्या भिंती मातीच्या असून फक्त चारेक इंच जाडीच्या होत्या. माजघराच्या नूतनीकरणाच्या वेळी त्या ढोल्या तोडताना तीन-चार कुदळी आणि तीन-चार सब्बली वाकल्या होत्या. भिंती तोडणारे मजूर परेशान होऊन गेले होते. मातीच्या त्या भिंती इतक्या मजबूत होत्या! त्या भिंती उभारताना मातीमध्ये काय मिसळण्यात आले होते हे कोडेच आहे! वाड्याच्या भिंतीसुद्धा तीन फूट रूंद असून त्याही मातीच्याच आहेत. उष्णतेची तीव्रता वाड्याच्या माजघरात भर उन्हाळ्यातही फारशी जाणवत नाही आणि हिवाळ्यात एखादा साधा कंबल (ब्लँकेट) पांघरून झोपणे, थंडीपासून बचावासाठी पुरेसे असते. म्हणजे नैसर्गिक एअर कंडिशनच! तो वाडासुद्धा तीन मजली आहे. वरच्या मजल्याची साफसफाई वर्षातून एकदा, दिवाळीच्यादिवसांतच केली जात असे. आणि ही बाब गौरवा (?) ची मानली जात असे, की आमचा वाडा एवढा मोठा आणि प्रशस्त आहे, की त्याच्या संपूर्ण भागाची साफसफाईसुद्धा करणे कठीण (!) असते. वाड्याला दोन विशाल लाकडी दरवाजे असून त्या दरवाज्यांमुळे वाड्याला किल्ल्याचे दर्शनी रूप प्राप्त झाले आहे. वाड्यातील जोडणी (छत आणि खांब यांसह) नाविन्यपूर्ण आणि कल्पक, नाजूक कलाकुसरीची आहे. सुतार-लोहारांच्या त्या कला-निपुणतेपुढे कोणीही नतमस्तक होईल!

डोंगरगांव (सावली) येथील हवेली (वाडा)

गावात एक जुनी हवेली आहे. ती हवेली उभारणाऱ्या मालकाच्या वंशजांची संख्या (अपत्य संख्या) आता वाढल्याने वेगरचार (बटवारे) होऊन हवेलीच्या वर्तमान मालकांची संख्या दहापर्यंत पोचली आहे. तरी हवेलीचा बाल बाकाझालेला नाही. बटवारे झाले असले तरी हवेली तोडण्यात आलेली नसून अजूनही तिची रचना व बांधकाम कायम आहे. त्या हवेलीचे दर्शन गोंदिया-देवरी राज्य महामार्गावरील बसमधूनदेखील होते. त्यामुळे गावाला हवेलीवाला गाव असे टोपणनावसुद्धा आहे. गोंदिया-देवरी राज्य महामार्गावरील डोंगरगाव (सावली) येथे डोये (कुणबी) पाटील यांचा वाडा उभा आहे. चक्रीवादळाने (2019) वाड्याच्या सौंदर्याला व भव्यतेला काहीसे डागाळले आहे. वाड्याच्या चुलत परिवारातील एका सुविद्य मालकिणीने एकेकाळी (1964-70) तत्कालीन भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात यशस्वी ठसा उमटवला होता. वाड्याच्या मालकांपैकी एक प्रसिद्ध काष्ठशिल्पज्ञ कलावंत आहेत. त्यांच्या काष्ठ कलाकृती देशविदेशात नावाजल्या गेल्या आहेत. आमगावचा सिनेकलावंत हर्षज पुंडकर आणि त्याचे सहकारी यांनी निर्मिलेल्या, लघुचित्रपट दारवठाचे चित्रीकरण डोये वाड्यातच झाले आहे. आमगाव तालुक्यातील जामखारी येथील भव्य वाडासुद्धा त्याचे अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकवून आहे.

जामखारी येथील हवेली (वाडा)

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील जमीनदार कटरे (देशमुख) यांच्या परिवारातील विठोबा हे 1870 च्या सुमारास जामखारी येथे स्थलांतरित झाले. विठोबा कटरे पाटील यांनी बांधलेला वाडा सुस्थितीत असून त्याचा परिसर सुमारे पाच एकर आहे. वाडा तीन मजली असून वाड्यातील दरवाज्यांवरील बारीक व नाजूक कलाकुसर मनमोहक आहे. वाड्याची जोडणी साधी-सोपी मांडणी व उभारणी यांमुळे नयनरम्य बनली आहे. त्या वाड्याशी संबंधित एक कथा अशी, की विठोबा पाटलांनी जामखारीत जम बसवला तेव्हा त्या गावात शेतीसाठी पाणीपुरवठा करणारे तलाव नव्हते. म्हणून त्यांनी तलावाचे खोदकाम व बांधकाम सुरू केले. त्यांना तेथे जमिनीत गाडलेली मध्यम आकाराची हनुमान मूर्ती आढळून आली. ती मूर्ती आमगावच्या बहेकार जमीनदारांच्या मूळच्या मालकीच्या जमिनीत सापडल्याने प्रथेप्रमाणे बहेकारांनी आमगाव येथे नेऊन स्थापित करावी असा सूर निघाला. पण तरीही ती मूर्ती तलावाच्या पाळीवरच काही वर्षे पूजली जात राहिली. अखेर विठोबा पाटील यांच्या मुलाने, दयाराम पाटलाने तलावाच्या पाळीवरच मंदिर बांधून तेथे त्या हनुमान-मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ती मूर्ती व मंदिर त्या भागात प्रसिद्ध असून सध्या दर मंगळवारी व शनिवारी तेथे भक्तांची रीघ असते.

अंजोरा येथील बहेकार वाडा

आमगाव ते देवरी या राज्य महामार्गावरील अंजोरा या गावी तेथील जमीनदार बहेकार यांचा विस्तीर्ण वाडासुद्धा वैभवशाली आहे. परंतु त्याचा काहीसा भाग भंग पावला आहे. उरलेल्या हवेल्या आणि इमारती पाहून वाड्याच्या एकेकाळच्या वास्तुसुंदर इतिहासाची ओळख पटू शकते. वाडा कोणी बांधला याबाबत सध्याच्या पिढीतील प्रकाशभाऊ बहेकार आणि रमेश(छोटू)भाऊ बहेकार यांना कल्पना नाही. आमगाव येथील जमीनदार मार्तण्डराव बहेकार यांचे वडील बंधू माधवराव यांच्या कारकिर्दीत (1870 च्या आसपास) तो बांधण्यात आला असावा. वाड्याच्या भिंती चार-पाच फूट रूंदीच्या आहेत. वाड्याचा परिसर पाच एकरांचा असून वाड्याचे स्थान गावालगत पण गावाबाहेर असे आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावर द्वाराच्या दोन्ही बाजूंला कचेरीसदृश्य ओसरी आहे. वाड्यात प्रवेश केल्यावर, मोठ्या विस्तीर्ण अंगणातून सुमारे शे-दीडशे पावले चालल्यावर वाड्याच्या मुख्य इमारतीचे/हवेलीचे नयनरम्य दर्शन होते. त्यावरून इमारतीच्या/हवेलीच्या पूर्वश्रीमंतीचा अंदाज सहज बांधता येतो. वाड्याच्या एका मुख्य इमारतीचे अंतर्द्वार अद्भुत अशा नाजूक आणि मोहक कलाकुसरीने समृद्ध आहे. जोडणीसुद्धा तिचे दमदार अस्तित्व टिकवून आहे. इमारतीचे छत वादळ-वाऱ्यांमुळे थोडेसे विस्कळीत झाले आहे, तरी कलाकुसरीने समृद्ध अंतर्द्वाराचे आणि मजबूत जोडणीचे दर्शन मात्र, पाहणाऱ्याला वाड्याच्या पूर्ववैभवाचा व वाड्याच्या तत्कालीन मालकाच्या सौंदर्यदृष्टीचा इतिहास स्पष्ट करून जाते. वाड्याचे मालक माधवराव —>> मल्हारराव –>> भोलानाथ आणि भोलानाथ यांचे चार पुत्र —>> अनुक्रमे प्रकाश रमेश (छोटू भाऊ) — सुरेश आणि जगदीश. हे चार बंधू वर्तमान पिढीचे शिलेदार/वारसदार आहेत.

बोरकन्हार येथील वाडा

झाडीपट्टीतील वाड्यांचे एक मोठे पण दुर्लक्षित वैशिष्ट्य म्हणजे ते वाडे प्रत्येकी पाच-सात एकरांपर्यंत परिसर व्यापून असले व वाड्यांचे बांधकाम त्यांपैकी पस्तीस ते पन्नास टक्के जागेतच झाले असले तरी उर्वरित जागा ही रिकामी/मोकळी/वैराण/पडीक नसते. त्या ठिकाणी विहीर असतेच असते. शिवाय, विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे आणि बाराही महिने घरचा भाजीपाला उपलब्ध होईल अशी परसबाग उभारलेली असते. त्यामुळे वाड्यांचा भव्य परिसर मोहक वाटतो. ग्रामीण भागात मजूर उपलब्ध होत नाहीत. शिवाय, वाड्यातील बहुसंख्य नवीन पिढी शहर-नगरवासी झाल्याने काही वाडे खंडहर होऊन भकाससुद्धा भासत आहेत. त्यातही आशेचा किरण असा, की नवीन पिढीतील (मोजके) तरुण-तरुणी गावाकडे व शेतीकडे वळू पाहत आहेत. त्यामुळे काही वाड्यांना पूर्व-वैभव लाभेल अशी अपेक्षा आहे.

(वाडा आणि हवेली यांतील फरक एका वाक्यात सांगायचा तर वाडा म्हणजे किल्ल्याचे छोटे प्रारूप तर हवेली म्हणजे खूप खोल्या व ड्रॉईंग रूम असलेली एक भव्य इमारत)

(या लिखाणासाठी मला ज्ञानेश्वर टेंभरे, गोंदियाचे खेमेंद्र कटरे, थानसिंग कटरे, लेखेश्वर कटरे प्रकाश बहेकार आणि बेरार टाईम्स या व्यक्ती-संस्थांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहकार्य लाभले.)

लखनसिंह कटरे 7066968350lskatre55@gmail.com

लखनसिंह कटरे हे उच्चविद्याविभूषित आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे निवृत्त जिल्हा सहकार निबंधक आहेत. त्यांचे प्रमेय’, ‘जाणिवेतले कर्कदंश’, ‘आदिम प्रकाशचित्रे’, ‘इतिहास आढळत नाही’, ‘शब्दार्थाचे आधार निष्फळहे काव्यसंग्रह, ‘शाश्वत मौनाचे स्वगतहा अभंगसंग्रह, ‘एकोणिसावा अध्यायहा कथासंग्रह अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते नवव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि अकराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.

———————————————————————————————————————————————————

झाडीपट्टीतील वाड्यांच्या आतील भागांची आणि दरवाजांची काही छायाचित्रे –

जामखारी येथील हवेलीचा दरवाजा

डोंगरगांव (सावली) येथील हवेलीच्या आतील भाग

———————————————————————————————————————————

8 COMMENTS

  1. अप्रतिम माहितीपूर्ण लेख व अस्तंगत होत असलेला हा ठेवा जपायला नवीन पिढी रस घेत आहे हे कौतुकास्पद.

  2. झाडीपट्टीतील वाडे… आदरणीय श्री. लखनसिंह कटरे सर लिखित…खूप सुंदर लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here