शकुंतला क्षीरसागर (Tribute to Shakuntala Kshirsagar – ShriKeKshi’s wife)

1
62
शकुंतला क्षीरसागर

शकुंतला क्षीरसागर या जुन्या पिढीतील साक्षेपी, निष्ठावंत संशोधक. त्यांचे 23 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे येथे निधन झाले. मराठी वाङ्मयक्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक आणि तत्त्वचिंतक श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या त्या पत्नी. शकुंतलाबाईंचा सहभाग श्री. के. क्षीरसागर यांचे आत्मचरित्र तसबीर आणि तकदीर’, समीक्षेचे पुस्तक टीकाविवेकआणि त्यांच्या लेखनात महत्त्वाचा होता. श्री.के. क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर शकुंतलाबाईंनी त्यांच्या लेखांचे ‘लैंगिक नीती आणि समाज’ हे संपादित पुस्तक ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या मदतीने प्रसिद्ध केले. ते त्यांचे मोठे काम होते. त्या पुस्तकाला निर्मलकुमार फडकुले यांची प्रस्तावना आहे. त्या एके ठिकाणी म्हणतात, की तरुण पिढीने पुस्तकातील विचार समजून घेतले तर व्यसनाधीनता आणि स्त्रियांकडे पाहण्याची विकृत वृत्ती यांच्यात बदल घडेल. त्यांनी केशवसुतांच्या कवितेचा शैलीवैज्ञानिक अभ्यासया विषयावर संशोधन करून पीएच डी ही पदवी मिळवली.

          आधुनिक मराठी कवितेचे जनक असणारे केशवसुत व त्यांची समग्र कविता यासंबंधी संशोधनावर आधारित एक परिपूर्ण आवृत्ती (संपूर्ण केशवसुत) पॉप्युलरने प्रकाशित केली. शकुंतला क्षीरसागर यांनी त्या आवृत्तीच्या संपादक या नात्याने मोठे काम केले. केशवसुतांसंबंधीचे बहुतेक सर्व संदर्भ त्या आवृत्तीत उपलब्ध आहेत.

          अभ्यासकांना उपयुक्त होतील असे शकुंतलाबाईंनी लिहिलेले, केशवसुतांच्या काव्यातील आशय, अभिव्यक्ती या संबंधीचे विवरणात्मक लेख, अनेक टिपा, केशवसुतांची चरित्रविषयक माहिती, त्यांचा चरित्रपट, सूची या मूळ कवितांना पूरक अशा मजकुराचा समावेश ग्रंथात आहे.

          शकुंतला क्षीरसागर यांनी प्रबंध कसे लिहावेत या विषयावर प्रबंधलेखनाची पद्धतीहे पुस्तक लिहिले आहे.

——————————————————————————————–————————————–

प्रबंधलेखनाची पद्धती – प्रबंधलेखकांना दिलासा

मला मी बहिस्थ परीक्षक म्हणून पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधांवरून नजर फिरवताना बहुसंख्य प्रबंधांमध्ये संशोधन पद्धतीचा अभाव गेली अनेक वर्षें सातत्याने जाणवत होतात्यामुळे शकुंतला क्षीरसागरयांचेप्रबंधलेखनाची पद्धतीहे पुस्तक पाहिल्यावर प्रथम दिलासा मिळाला. ते वाचल्यावर, मला त्यातील मार्गदर्शक सूचना पाळणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रबंध दर्जेदार निपजतील अशी खात्रीही वाटली. क्षीरसागर यांच्या या पुस्तकाआधी प्रबंधलेखन पद्धतीवर पुस्तके होती, लेखिकेने स्वत: तिच्या पुस्तकात तशा काही संदर्भांचा निर्देश केला आहे, तथापि प्रबंधविषयाच्या निवडीपासून प्रबंध सादर केल्यानंतर होणार्‍या मौखिकी परीक्षेपर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्याला ज्या ज्या प्रश्नांना सामोरे जावे लागते त्या सर्व प्रश्नांची उकल यथासांग करणारे आणि तरीही आटोपशीर असे हे बहुधा पहिले पुस्तक असावे.

लेखिका स्वत: संशोधक, उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुरस्काराने सन्मानित आणि पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयासारख्या प्रतिष्ठीत ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रस्तुत विषयातील अधिकार वादातीत आहे. पुस्तकात प्रबंधविषयाची निवड, त्याच्या अनुषंगाने करण्याचे वाचन, विषयवैविध्यानुसार बदलणारे अभ्यासविषयांचे तपशील, ग्रंथालयाचा उपयोग, ग्रंथांच्या नोंदी करण्याचे संकेत, अभ्याससाधनांचा यथायोग्य उपयोग, टिपणे करण्याच्या पद्धती यांसारख्या ठळक बाबींबरोबर प्रबंधाची अक्षरजुळणी, बांधणी आणि प्रस्तुती; तसेच, संदर्भ देण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती इत्यादी अनुषंगिक पण महत्त्वाच्या विषयांचीही सविस्तर चर्चा आहे. लेखिकेने वेळोवेळी केलेल्या बारीकसारीक सूचना पुस्तकाचे उपयुक्ततामूल्य वाढवतात. उदाहरणार्थ, त्यांनी स.गं. मालशे यांनी त्यांच्या पुस्तकात 1975 साली सुचवलेल्या विषयांपैकी फारच थोड्या विषयांवर संशोधन झाले आहे असे सांगून विद्यार्थ्याने जुन्या पुस्तकांकडे दुर्लक्ष करता कामा नये असे सुचवले आहे. लेखिकेची प्रस्तुत विषयावरील प्रामाणिक निष्ठा आणि तळमळ पुस्तकाच्या पानोपानी प्रत्ययाला येते. लेखिकेने विषय निवडीसाठी ध्यानात घेण्याच्या बाबींमध्ये विद्यार्थ्याची क्षमता, विषयाची व्याप्ती, उपलब्ध साधनसामग्री; याबरोबरच, पुरेसा वेळ देण्याची गरज यांचा समावेश केला आहे. लेखिका आईच्या मायेने ग्रंथालयात येताना जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली आणण्यास कधी विसरू नये, कारण उपाशीपोटी वाचन होऊ शकत नाही असे सुचवते; तर संशोधनासंदर्भात मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ग्रंथकार ग्रंथावर स्वत:चे नाव घालतो तेव्हा त्याच्या पित्याचे नाव शोधण्याचा खटाटोप करून त्याची भर घालू नये अशी खबरदारी घेण्यास लावते. लेखिकेने पुस्तकभर संशोधनाच्या वाटेवर अडखळणार्‍यांना वाट दाखवण्याचे काम न थकता केले आहे. ज्यांना संशोधन कशाशी खातात हेही माहीत नाही अशा दूरस्थ, ग्रामीण भागातील चाचपडणार्‍या विद्यार्थ्याचे बोट धरून त्यांना दर्जेदार प्रबंध सादर करण्याकरता सज्ज करण्याची क्षमता या पुस्तकात आहे.

प्रबंधलेखनाची पद्धती (सुधारित आवृत्ती दुसरी)

लेखक : शकुंतला क्षीरसागर, प्रकाशक : युनिव्हर्सल प्रकाशन, पुणे २०१६.

किंमत : दीडशे रुपये

सरोजा भाटे (020) 24226854

(भाषा आणि जीवन (पावसाळा) 2016 वरून उद्धृत, संस्कारित)

————————————————————————————————–——————————–

1 COMMENT

  1. हे योग्य वेळेवर कळले मला ��थँक्सआता आमचे MA चे लघुप्रबंध सादर करायचे असून त्यासाठी योग्य मार्गदर्शन लाभेल या पुस्तकाचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here