अर्चना आंबेरकरची ग्लोबल भाषा (Archana Amberkar’s Global Language)

0
41

अर्चना आंबेरकर

भाषाशास्त्राची अभ्यासक अर्चना आंबेरकर दोन-अडीच वर्षांपूर्वी मला भेटली, ती तिला इंटरनेटवरील मराठी भाषेतील ‘डेटा’ हवा होता म्हणून. आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर मराठी भाषा-संस्कृतीबाबत अडीच-तीन हजार लेख संकलित केले आहेत. अजून खूप मोठे काम बाकी आहे. ते लोकांच्या पाठिंब्यावरच होऊ शकेल! अर्चना त्या डेटाच्या शोधात माझ्याकडे आली होती. ती त्यावेळी मराठी भाषा व बोली यांच्या संबंधीच्या एका मोठ्या प्रकल्पात बंगलोर येथून काम करत होती. तिची एक टीम होती. तशा तीन-चार टीम ठिकठिकाणांहून तशीच कामे करत होत्या. त्यांना अंतरांचे, प्रदेशांचे बंधन नव्हते. अर्चना भाषेच्या लकबी जाणू इच्छित होती –म्हणजे मराठी माणसे बोलताना म्हणतात, ना “काय साताऱ्याला-बिताऱ्याला गेला-बिला होतास का काय अलीकडे?” त्यातील ‘बिताऱ्याला’, ‘बिला’ या काय भानगडी आहेत? तिला मराठीच नव्हे तर तिच्या मालवणी वगैरे बोलीमधीलदेखील अशी वैशिष्ट्ये जाणून घेण्याचे औत्सुक्य होते. ती भाषेत उद्भवतात कशी? रूळतात कशी? वगैरे…अशा अनेक लकबी आणि त्यांची त्यांची भाषाशास्त्रातील गुंतागुंत! पण अर्चनाला आता, तिच्या या नव्या कामामध्ये केवळ शब्द अथवा भाषाविज्ञान जाणून घ्यायचे नव्हते. त्यांचे उपयोजन सुचवायचे होते. तिचे काम भाषेचे परस्परसंपर्काचे कार्य यंत्राधारित कसे साधता येईल हे जाणण्याचे व त्यासाठी प्रयोग करण्याचे होते. ती भाषाशास्त्रातील निव्वळ संशोधनापलीकडे पोचली होती. माझे व तिचे बोलणे जवळजवळ तासभर चालू होते. भाषा संगणकात व त्याच्या पुढील तंत्रसाधनांत बसवण्यासाठी जो जगड्व्याळ खटाटोप सर्वत्र चालू आहे, तो ऐकून मी अचंबित होत होतो.
          अर्चना ही लहानपणापासून हुशार मुलगी. ती बारावीच्या परीक्षेत पहिल्या दहा नंबरांत आली होती. स्वाभाविकच तिने मेडिकलला जावे अशी पालकांची इच्छा; परंतु, ती आग्रहाने कला शाखेकडे गेली. पदवीनंतर अर्चनाने भाषाशास्त्र या विषयात एमए केले, पीएचडी करण्याआधीच तिला ‘मराठीतून हिंदी व उलट, अशा यंत्रसहाय्यित प्रकल्पात’ काम मिळाले. ते तिच्या अभ्यासाला पूरकच होते. त्यानंतर तिने ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’साठी ध्वनी उच्चारण व त्याचा आलेख अशा प्रकल्पात काम केले. तिने त्यासाठी पाच स्त्रिया व पाच पुरुष यांच्याकडून तीन हजार शब्द उच्चारून घेतले व त्यांचा आलेख मांडला. तेथून तिने मुंबईतच त्या स्वरूपाच्या खासगी एकदोन कंपन्यांतील नोकऱ्या करून सरळ बंगलोर गाठले. तेथे तोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेतील (‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’मधील) भाषाविषयक ‘प्रोग्राम’ बनवण्याची आव्हाने बरीच तयार होऊ लागली होती. मला ती भेटली तेव्हा तशाच एका प्रोग्राममध्ये ती काम करत होती. त्यासाठीच तिची टीम होती. त्यानंतरच्या गेल्या दोन वर्षांत तिने दोन नोकर्‍या बदलल्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी तिच्या कामाचे स्वरूप सपासप बदलत गेले आहे. ती जे भाषाशास्त्र शिकली त्याची मूलतत्त्वे कायम आहेत, परंतु त्यांचा उपयोग बदलत चालला आहे.
          मराठी व अन्य भाषा यांच्यासाठी ‘चॅटबॉट’ बनवणे, त्यांना दिलेल्या भाषिक सूचना समजून – त्यांनी त्यात योग्य उत्तरे देणे हे काम सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. त्यांचा रोख दैनंदिन व्यवहारात जेथे जेथे भाषेची गरज आहे तेथे तेथे भाषेचे ते काम यांत्रिक पद्धतीने केले जावे, तेथे माणसाची गरज लागू नये यासाठी आहे. ती संभाषणे, ती प्रश्नोत्तरे जशी बोली भाषांत यायला हवीत तशीच लिखित स्वरूपातही यायला हवीत. तशी साधने एक-दोन वर्षांत तयार होतील व नंतर बरीचशी भाषिक कामे ‘चॅटबॉट’मार्फत केली जातील. मी तिच्या त्या अद्भुत गोष्टी ऐकत असताना अखेर तिला विचारले -याचा अर्थ भाषाशास्त्रातील संशोधनदेखील चॅटबॉटअथवा यंत्रे करतील का? ती ‘कुठले संशोधन’ असे म्हणाली आणि तिनेच पुढे जोड दिली, ‘शक्य आहे’! मी जवळजवळ संमोहित झालो होतो. त्यानंतर पुन्हा माझे व अर्चनाचे फार बोलणे होत नव्हते. परंतु तिने बदललेल्या नोकर्‍या कळत होत्या. त्यांतील कामाचे स्वरूप अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे हे जाणवत होते. भाषेचा दैनंदिन व्यवहार अधिकाधिक यंत्राधीन करण्याचा एकूण प्रयत्न आहे हेही ध्यानी येत होते.
          अर्चना मला दोनअडीच वर्षांपूर्वी भेटली तेव्हापासून मी अस्वस्थ होतो, की भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचे, त्याच्या जिवंतपणाचे लक्षण, तेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआयच्या) हाती दिले गेले तर माणूस टिकणार कशाच्या जोरावर? अन्न हे जसे शरीरपोषणासाठी जरुरीचे, त्याच प्रकारे भावना-विचार-चिंतन यांना मूर्ताकार लाभतो तो भाषाविष्कारातून. माणसाने ती शक्ती काही हजार वर्षांच्या प्रयत्नांतून प्राप्त केली आहे. शब्दाक्षर भाषेची जागा व्हिज्युअल लँग्वेज घेऊ शकेल अशी चर्चा गेली काही वर्षे चालू आहे. मी स्वतःच तसे परिसंवाद एक-दोन ठिकाणी योजले होते, पण ते निष्फळ ठरले होते. त्यातून फार काही हाती लागले नव्हते. अक्षरभाषा आणि चित्रभाषा यामध्ये दोन पिढ्यांचे अंतर आहे. ते कसे पार होणार हेच मला त्यावेळी जाणवले होते.
          मी अर्चनाला एकदा म्हटले, की तू भाषाशास्त्राची जाणकार. त्या शास्त्रातील अभ्यास-संशोधन यंत्राहाती जाणार या शक्यतेने तुला धक्का नाही बसला? ती म्हणाली, की आरंभी बसला तर! पण नंतर ध्यानी आले, की भाषेची रचना व संभाषण यांतील जो मानवी घटक आहे तो हरपला जाण्याची शक्यता नाही. परंतु यंत्र काय करते? तर कोणत्याही कृतीतील पॅटर्न शोधते आणि त्याचे अनुकरण करत राहते. ‘चॅटबॉट’साठी संभाषणाचे पॅटर्न शोधणे व त्याचे ‘डिझाइन’ तयार करणे अशा प्रकारचे काम सर्वच भाषांत सध्या जोरात चालू आहे. ते भाषानिरपेक्ष होऊ शकते. 
          अर्चनासारखे बरेच तरुण-तरुणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये भाषांना संगणकीय ढाच्यांमध्ये बसवण्याचे काम जगभर करत आहेत. व्हेरीझॉन, अॅमेझॉन यांच्यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना जगभरच्या सर्वच भाषांमधून व्यवहार करण्याची गरज भासत असते. त्यांच्याकडे या प्रकारचे संशोधन व उपयोजन फार झपाट्याने पुढे जात आहे. गुगल तर त्यांच्यातील आणखी मोठी कंपनी. तिचे तर म्हणे जगातील सर्व भाषांमध्ये ‘असिस्टंट’ निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे स्वाभाविकच भाषाविषयक कामे करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना ठिकठिकाणी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. बार्बी डॉल पन्नास वर्षांची झाली तेव्हा ती जगभरच्या अनेक भाषांतून बोलली. त्या एकेरी निवेदनापासून संभाषणांपर्यंतची मजल या संगणकीय भाषांनी मारली आहे. आरंभी ती मला भाषेमधील लुडबूड वाटे, कधी त्यात मूळ भाषेवर आक्रमणही जाणवे, परंतु अर्चना आणि तिच्यासारख्या अन्य तरुण-तरुणी यांच्याशी बोलण्यातून माझी समजूत वाढली गेली. संगणक आल्यापासून संगणकाच्या नव्या भाषांबाबत बोलले जाई. मला ते अर्धे उलगडे, अर्धे उलगडत नसे. मी तो तांत्रिक भाग म्हणून नेहमी सोडून देत असे, पण मला आता खरोखर (आ)कळून चुकले आहे, की नव्या ग्लोबल युगाची ग्लोबल भाषा येऊ पाहत आहे. माणसाने त्याच्या मातृभाषेत काही बोलावे आणि त्याचे रूपांतर संकेतांतून (कोडिंग), त्यांच्या व्यवस्थापनातून (मॅनेजमेंट) ऐकणाऱ्याच्या भाषेत व्हावे आणि जगभरची संपर्कसाधना (कम्युनिकेशन) अबाधित राहावी; नव्हे, वाढत राहावी यासाठी हा सारा खटाटोप आहे. कोरोनाने आणलेल्या मर्यादा थोडा वेळ विसरून जाऊया. जग पुढेही ग्लोबल राहील. जगात त्यापुढेही जन्मणारी सर्व बालके ग्लोबल असतील. ती त्यांच्या त्यांच्या प्रदेशांनुसार स्वतःच्या भाषांमध्ये बोलतील, पण तरी त्यांचा सर्व जगाशी संपर्क ठेवला जाईल. त्याची सोय ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून अशी केली जात आहे तर! अर्चना व तिच्यासारखे तरुण-तरुणी भाषाविषयात वेगवेगळ्या मोठमोठ्या नोकऱ्या करतील, ती अधिकाधिक मोठी होतील. त्यातून भाषाच अधिक विकसित होत जाईल असे चित्र आत्तातरी वर्णन करता येते.
अर्चना आंबेरकर 9820707855 amberkararchanaa@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
—————————————————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here