ख्रिस्ती महिला संत; भारतातील तीन ! (Indian Women Christian Saints)

1
49

भारतात ख्रिश्चन धर्म पंधराशे वर्षे अस्तित्वात असला तरी केवळ तीन भारतीय स्त्रियांची संत म्हणून गणना त्या धर्मात होते. सर्व धर्मपंथांत संत परंपराही आहे. संत परंपरा ही सहसा भक्तीशी जोडलेली असते. भक्ती कोणाची? तर देवाची. पण देवसंकल्पना हीदेखील प्रत्येक धर्मपंथाने स्वत:ची अशी ठरवून ठेवलेली आहे. त्यामुळे भक्तीची कल्पना आणि भक्ताचे परमोच्च रूप जो संत त्याचेही महत्त्व धर्मागणिक बदलते. भारतात सर्वात मोठा जो हिंदू धर्म; त्यामध्ये आचारविचारांची आखीव अशी रचना नाही. स्वाभाविकच, संत कोणाला म्हणावे याबाबतची पक्की व्याख्या नाही. चांगल्या वर्तनाच्या माणसासही संत म्हटले जाते आणि सर्वोत्कृष्ट भक्त जे तुकाराम, ते संतही असतात व त्यांना जगद्गुरूही संबोधले जातात. हिंदू धर्मात; किंबहुना भारतीय परंपरेत फादर स्टिफन्स व शेख महंमद यांनाही संत म्हटले जाते आणि संत कबीर हे सर्वधर्मभावाचे उत्तम प्रतीक ठरते.

भारतीय संतांच्या मांदियाळीवर नजर फिरवली, तर असे दिसून येते, की त्यांनी विधात्याशी जो संवाद साधला तो त्यांनी त्यांच्या कीर्तनांतून, प्रवचनांतून शब्दबद्ध केला. तो कानोकानी गेला आणि भारतभर प्रसृत झाला. भारतीय धार्मिक परंपरेनुसार अध्यात्माचा वा पारमार्थिक जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्यांना संतपद दिले जाते, ज्यांनी प्रपंच नाकारला आणि परमार्थाला अग्रस्थान दिले आणि हे लौकीक जीवन क्षणभंगुर आहे… पारमार्थिक वा पारलौकिक जीवन हेच सत्य असल्याचे त्यांनी त्यांच्या विचारातून आणि वर्तनातून दाखवले. बरेचसे संत प्रापंचिकही होते, मात्र प्रपंचाविषयी उदासीन होते; ते प्रपंचातून परमार्थ साधत राहिले.

मराठी संतांच्या मालिकेत फादर थॉमस स्टिफन्स आणि शेख महंमद यांचाही समावेश केला जातो. पंथीय वाङ्मयीन परंपरेत ख्रिस्ती आणि मुस्लिम म्हणून या दोन्ही कवींचा उल्लेख आढळतो. फादर थॉमस स्टिफन्स हे कॅथॉलिक पंथीय धर्मगुरू होते. त्यांनी प्रपंच नाकारला होता आणि स्वखुशीने, ख्रिस्तसेवेला त्यांचे जीवन वाहिलेले होते. परंतु ख्रिस्ती कॅथॉलिक पंथीयांच्या धर्मपीठाने, रोमने त्यांना संतपद बहाल केले नाही. संतपद प्राप्त होण्यासाठी रोममधील पोप या सर्वोच्च धर्माचार्यांनी दिलेल्या निकषांत ते बसत नव्हते. मात्र मराठीतून ख्रिस्तपुराणलिहून अध्यात्माचा मार्ग दाखवल्याबद्दल मराठी संतसाहित्यात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे.

ख्रिस्ती धर्म हा संघटनात्मक दृष्ट्या पक्का बांधलेला व तशा घट्ट परंपरा असलेला आहे. इटालीतील व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिस्ती धर्माचे मुख्य पीठ आहे. ख्रिस्ती धर्मातही कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट हे दोन मुख्य प्रवाह आहेत व त्या दोन्ही प्रवाहांत अनेकविध पंथपरंपरा आहेत. पोप हे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे गुरू होत. ते व धर्मसंघटना मिळून व्हॅटिकन सिटीमधून धर्माचे विधिनियम आखून देतात. त्याच प्रमाणे कॅथॉलिक ख्रिश्चन धर्मामध्ये संत परंपरेबाबतचे नियमही आखून दिले आहेत व त्यांचे काटेकोर पालन केले जाते. ख्रिस्ती धर्मातील कॅथॉलिक म्हणजे परंपरावादी आणि त्यांना विरोध करणारे ते प्रोटेस्टंट. असे प्रोटेस्टंट पंथ अनेक आहेत. कॅथॉलिक पंथीय मूर्तिपूजक अथवा विभूतीपूजक आहेत. प्रोटेस्टंट पंथीय मूर्तिपूजा विरोधक असतात. ते बायबलमधील शब्दप्रमाण मानतात. तथापि या दोन्ही प्रमुख पंथांत ख्रिस्तहा देवाचा मुलगा हे प्रमुख विधान आहे. येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या कित्त्यानुसार, शिकवणुकीनुसार अनुसरण करणारे ते ख्रिस्ती.

         कॅथॉलिक पंथात प्रपंच नाकारून परमार्थाकडे जाण्यासाठी व्रतस्थ जीवन स्वीकारण्यास महत्त्व दिले जाते. तसे जीवन स्वीकारणाऱ्या तरुण-तरुणींना, म्हणजेच कुटुंबातून धर्मगुरू वा धर्मभगिनी होण्यास गेलेल्यांना ख्रिस्ती समाजात प्रतिष्ठेचे स्थान असते. ते त्यांचे तारुण्य, तारुण्यातील जीवन ख्रिस्तचरणी अर्पण करून, सेवाभावी जीवन जगण्यासाठी लौकिक जीवन नाकारून त्यांचे घरदार, गणगोत यांचा त्याग करतात. तशी तरुण मुले धर्मगुरू (priest) होतात आणि तरुण मुली धर्मभगिनी (nun) होतात.

         कॅथॉलिक पंथात संत-परंपरा आहे. ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवून जीवन व्यतीत करणाऱ्यांपैकी काही जणांना, त्यांच्या मृत्यूनंतर कॅथॉलिक पंथीय रिवाजानुसार संतहे पद बहाल करतात. त्यासाठी रोमच्या म्हणजेच व्हॅटिकन सिटी येथील धर्मपीठाच्या नियमानुसार काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. कॅथॉलिक धर्मपीठाचे सर्वेसर्वा पोप यांनी संत म्हणून मान्यता दिलेल्यांपैकी बहुसंख्य हे व्रतस्थ धर्मगुरू वा धर्मभगिनी यांच्यापैकीच आहेत. कुटुंबव्यवस्थेला महत्त्व असलेल्या या पंथात, ज्यांनी कुटुंबव्यवस्था नाकारून समाजसेवेसाठी त्यांच्या जीवनाचे अर्घ्य दिले आहे अन् हे विश्वचि माझे घरअसा व्यापक कुटुंबाचा अर्थ दिला आहे, त्यांना संतपद मिळणे स्वाभाविक आहे. प्रोटेस्टंट पंथात संत-परंपरा नाही.

          सेवाभावी कार्य करताना स्वर्गवासी झालेली धर्मभगिनी वा धर्मगुरू हा परमेश्वरासोबत असल्याकारणाने, त्या विशिष्ट व्यक्तीकडे कळकळीने प्रार्थना केल्यास ती स्वर्गवासी व्यक्ती तिचे गाऱ्हाणे परमेश्वराकडे रुजू करते आणि परमेश्वर पृथ्वीवरील जीवित व्यक्तीला कृपादान देतो,त्याचे संकटनिवारण करतो अशी श्रद्धा आहे. म्हणजेच ख्रिस्तवासी झालेली ती विशिष्ट व्यक्ती कृपाशीर्वाद प्रदान करण्याच्या अवस्थेपर्यंत पोचलेली असते. संतिकरणाची ती पहिली पायरी समजली जाते, शिवाय तिच्या मध्यस्थीमुळे पृथ्वीतलावरील जिवंत असलेल्या व्यक्तीच्या जीवनात जे परिवर्तन घडते, ते चमत्कार समजले जातात. त्यामुळे ख्रिस्तवासी झालेल्या त्या व्यक्तीला धन्यवादित (Beatification) म्हणून पोपमहाशय जाहीर करतात, त्यानंतर घडलेले चमत्कार खरोखरच घडले आहेत का? याची तपासणी केली जाते. विज्ञानाच्या कसोटीवर जे बरे होऊ शकले नाहीत; ते श्रद्धेच्या कसोटीवर बरे झाले आहेत याची खात्री पटल्यावर, काही वर्षांच्या कालावधीनंतर त्या विशिष्ट व्यक्तीला संतांच्या मालिकेत समाविष्ट केले जाते आणि कॅथॉलिक पंथियांचे धर्माचार्य, मठाधिपती पोप त्या विशिष्ट व्यक्तीला संतम्हणून अधिकृतपणे जगजाहीर करतात.

          भारतातील केवळ तीन धर्मभगिनींचा समावेश ख्रिस्ती संतमालिकेत झालेला आहे : 1. सिस्टर आल्फोन्सा- 2008– केरळ ; 2. सिस्टर युफ्रेसिया- 2014– केरळ ; 3. मदर तेरेसा-2016– कोलकाता.

          संत असलेल्या या व्यक्ती परमेश्वरापर्यंत पोचण्याची पायवाट तयार करत असतात. या तिन्ही भारतीय महिला संतांचा परिचय –

संत सिस्टर आल्फोन्सा

           1. संत सिस्टर आल्फोन्साः या पूर्वाश्रमीच्या अॅना मुत्ताथुपडाथील. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1910 साली केरळमधील अर्पूकारा येथे झाला. वडील जोसेफ मुत्ताथुपडाथील आणि आई मेरी पुथुकरी. सिरोमलबार नसरानी कुटुंब धार्मिक होते. आई बालपणीच मरण पावल्याने अॅनाला तिच्या मावशीने वाढवले, परंतु सावत्रपणाचे चटके मात्र अॅनाला भोगावे लागले. तीन वर्षांची असताना ‌‌‍अॅनाला इसप या त्वचारोगाने ग्रासले. तेरा वर्षांची असताना जळत्या भुशात सापडल्यामुळे तिचे पाय जळाले आणि तिला अपंगत्व आले. मावशीने लग्नाचा लकडा लावू नये, म्हणून अॅनाने तिचे पाय जळत्या भुशात पोळून घेतले होते, असे म्हटले जाते. तिने वयाच्या सतराव्या वर्षी धर्मभगिनी होण्यासाठी फ्रान्सिस्कन क्लारिस्ट कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला आणि दीक्षा-विधी झाल्यावर सिस्टर आल्फोन्सा अशी तिची ओळख प्रसृत झाली.

प्रारंभीच्या काळात सिस्टर आल्फोन्सा यांनी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम पाहिले. मात्र त्या सतत आजारी पडत असल्यामुळे त्यांच्या कामात अडथळा येत गेला. त्या प्रार्थनेतून परमेश्वराशी सतत संवाद साधत असत. एकदा मात्र न्यूमोनिया झाला असता त्यांची तब्ब्येत खालावली. पोटदुखीने त्यांना सतत उलट्याही होत होत्या. मध्यरात्री त्यांच्या खोलीत चोर घुसल्याने भीतीमुळे त्यांना स्मृतिभ्रंश झाला. सिस्टर आल्फोन्सा यांना 1941 मध्ये पुनश्च स्मृती प्राप्त झाली. त्यांचा मृत्यू 21 जुलै 1946 मध्ये अवघ्या पस्तिसाव्या वर्षी झाला. सिस्टर आल्फोन्सा आजाराने जर्जर झालेले त्यांचे सारे जीवन केवळ ख्रिस्तासाठी जगल्या. त्यांचा आदर्श कोणतीही तक्रार न करता त्याचे दुःख सहन करणारा ख्रिस्त होता. त्यांना त्यांचा परमेश्वराशी असलेला सततचा संवाद संतपदापर्यंत घेऊन गेला.

सिस्टर आल्फोन्सा यांच्या मृत्यूनंतर अनेक जण त्यांच्या मध्यस्थीसाठी प्रार्थना करत. एक मुसलमान मुलगा खुरट्या पायांचा होता. एका बिशप महोदयांनी, अधू पायांच्याच असलेल्या सिस्टर आल्फोन्सांची प्रार्थना करण्यास त्याला सांगितले. आश्चर्य म्हणजे सिस्टर आल्फोन्सांच्या मध्यस्थीने त्याचे वाकडे असलेले दोन्ही पाय सरळ होऊन तो व्यवस्थित चालू लागला ! तो चमत्कार स्वीकारून 8 फेब्रुवारी 1986 रोजी म्हणजे मृत्यूनंतर चाळीस वर्षांनी त्यांना धन्यवादित (Beatified) म्हणून जाहीर केले; त्यानंतर बावीस वर्षांनी म्हणजे 12 ऑक्टोबर 2008 रोजी पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी त्यांना संतपद बहाल केले. केरळचे तत्कालीन मंत्री, के. करूणाकरन यांच्या प्रयत्नांमुळे 1990 साली संत सिस्टर आल्फोन्सा यांच्या नावाचा पोस्टाचा स्टॅम्प भारत सरकारने प्रसारित केलेला आहे.

संत सिस्टर युफ्रेसिया

2. संत सिस्टर युफ्रेसियाः यांचे मूळ नाव सिस्टर रोझा. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1877 रोजी कोचीन येथे झाला. कुंजेथी एलुकथिंगल आणि चेरपुरकरन अँथनी हे तिचे जन्मदाते. त्यांचे कुटुंब सिरो मलबार चर्चच्या संस्कारातून धार्मिक वातावरणात फुलले होते. तीन भाऊ आणि एक बहीण असलेली रोझा भक्ती आणि विनम्रतेचा वारसा सांभाळत वाढत होती. रोझाला धर्मभगिनी होण्यासाठी देवदूत तिला साद घालत असल्याची जाणीव वयाच्या नवव्या वर्षी झाली. तिने जाणती झाल्यावर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश केला आणि प्रार्थनापूर्ण वातावरणात प्रभूच्या मळ्यात तिचे जीवन व्यतीत करण्याची दीक्षा घेतली. त्यानंतर, रोझा सिस्टर युफ्रेसिया म्हणून ओळखली जाऊ लागली.

रोझाची प्रकृती बालपणापासूनच तोळामासा अशी होती. शाळेच्या बोर्डिंगमधून तिला घरी परत पाठवू नये म्हणून ती तेव्हापासून प्रभूची प्रार्थना करत असे. धर्मभगिनी झाल्यावर तिला सांधेदुखीचा आजार जडला. कॉन्व्हेंट ऑफ मदर ऑफ कार्मेलमधील त्यांचे जीवन अत्यंत बंदिस्त आणि प्रार्थनापूर्ण होते. त्यांनी आत्मक्लेश सहन करत प्रार्थनामय जीवन केवळ ख्रिस्तावरील प्रेमाखातर व्यतीत केले. ख्रिस्ताशी एकरूप होणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे हेच त्यांचे जीवितध्येय होते. असे जीवन जगत असताना त्यांना पवित्र कुटुंबाचा साक्षात्कार झाला आणि त्यांचा दीर्घकालीन आजार पूर्णपणे बरा झाला. पवित्र कुटुंब म्हणजे येशू, त्याची आई मेरी आणि त्याचा पालक बाप जोसेफ यांचे कुटुंब. त्या साक्षात्काराने त्यांना सूचित केले, की तुला दीर्घ आयुष्य लाभणार आहे आणि तुझ्या जीवनातून पवित्र कुटुंबाची साक्ष प्रतीत होणार आहे.

अत्यंत शिस्तीचे आणि प्रार्थनापूर्ण आयुष्य जगणाऱ्या सिस्टर युफ्रेसिया यांच्या जीवनात काही चमत्कारपूर्ण घटनाही घडत होत्या. त्यांच्या प्रार्थनेचा प्रभाव इतका होता, की खाण्याची उपासमार होईल अशा स्थितीत असताना एखादी व्यक्ती अन्न घेऊन त्यांच्या दारात उभी होई. आजारी व्यक्तीवर हात ठेवून प्रार्थना केली, की ती व्यक्ती खडखडीत बरी होत असे. त्यांची मनोकामना कागदावर लिहून त्या प्रभूला साकडे घालत असत.

त्यांना त्यांच्या थ्रिशूर येथील कॉन्व्हेंटमध्ये देवाघरचे बोलावणे 29 ऑगस्ट 1952 रोजी आले. त्यांना पंच्याहत्तर वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्या ख्रिस्तवासी झाल्यानंतरदेखील काहींना सिस्टर युफ्रेसियाच्या साक्षात्काराचा अनुभव आला. हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ असलेल्या एका गृहस्थाच्या पत्नीने सिस्टर युफ्रेसियाची आठवण केली आणि सिस्टर युफ्रेसियाचा स्पर्श त्या पीडित व्यक्तीला जाणवला व तिला स्वास्थ्य प्राप्त झाले. असे अनेक चमत्कार गृहीत धरून सिस्टर युफ्रेसिया यांना त्यांच्या मृत्यूनंतर चोपन्न वर्षांनी (डिसेंबर 2006) व्हॅटिकनच्या धर्मपीठाने धन्यवादित म्हणून जाहीर केले. त्यानंतर आठ वर्षांनी, 23 नोव्हेंबर 2014 रोजी पोप फ्रान्सिस यांनी संतांच्या मालिकेत सिस्टर युफ्रेसिया यांचा समावेश झाल्याचे जाहीर केले.

संत मदर तेरेसा

3. संत मदर तेरेसाः मदरहा शब्द उच्चारताच नजरेसमोर मदर तेरेसा यांचीच मूर्ती उभी राहते. मदर तेरेसाहे एक मिथक झाले आहे- इतके महत्त्व त्यांच्या जीवनाला आहे. गरीबांची सेवा करत करत मदरजमिनीकडे झुकत झुकत गेल्या, अधिक विनम्र होत गेल्या. आकाशमार्गे सर्वाधिक प्रवास करत गरीब-गरजूंना भेटणाऱ्या आणि तरीही जमिनीवर पाय ठेवून सेवाभावी वृत्ती अंगी बाणवत ख्रिस्तासाठी त्यांचे जीवन अर्पण करणाऱ्या विश्वातील अत्यंत प्रभावशाली महिला म्हणून मदर तेरेसा यांची ओळख आहे.

ऍन्जेस (ऍग्नेस) गोंक्सा बोझाक्झियू या नावाची एक मुलगी उत्तर मॅसिडोनिया, अल्बेनिया येथील स्कोपजे या गावी 26 ऑगस्ट 1910 रोजी जन्मास आली. वडील निकोल्स आणि आई ड्रॅनाफाईल ! कुटुंब धार्मिक. तिला वयाच्या बाराव्या वर्षी दैवी हाक ऐकू आली आणि तिने ईश्वरी हाकेला रूकार भरला. जाणती झाल्यावर तिने बंगालच्या लॉरेटो कॉन्व्हेंटकडे अर्ज केला आणि 1929 या वर्षी अग्नेस गोंक्झा दार्जिलिंगच्या लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाल्या. मानवता मार्गावरील त्यांच्या प्रवासास सुरुवात झाली. मुलींच्या शाळेतील शिक्षिका म्हणून त्यांच्या कार्याचा प्रारंभ झाला. पुढे, शाळेच्या मुख्याध्यापक झाल्या आणि बंगाली तेरेसा अशी त्यांची नवी ओळख त्यांनी निर्माण केली. लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये त्या सिस्टर तेरेसा होत्या.

मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना शाळेच्या भिंतींपलीकडे असलेली मोतीझील झोपडपट्टी त्यांना साद घालू लागली. गरिबांचा जगण्याचा संघर्ष चालू असताना मी येथे स्वस्थ कशी राहू शकते या प्रश्नाने त्यांना गरिबांसाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. मिशनरीज ऑफ चॅरिटीया नावाने त्यांच्या कार्याचा आरंभ झाला तो 1950 साली ! मदर तेरेसा यांचा जीवनमंत्र देवासाठी काही सुंदर करूयाअसा होता. त्या कमी बोलणे आणि अधिक कार्य करणे याला महत्त्व देत. त्या प्रेमाचा अभाव म्हणजे गरिबी असे समजत. त्यासाठी त्यांनी त्यांचे कार्य जगभर सुरू केले. त्यांना गरीब लोकांत देव दिसे. त्यांना रोग्याच्या जखमांना स्पर्श करणे म्हणजे ख्रिस्ताच्या शरीरावरील जखमांना स्पर्श करणे असे वाटे. त्यांची भाषा प्रेमळ स्पर्शाची होती. ती भाषा जगभरच्या आजारी लोकांना कळत होती.

मदर तेरेसा यांनी परमेश्वराचा गौरव व्हावा अशी सेवाकृत्ये आमरण केली. त्या जिवंतपणीच संत म्हणून गणल्या जाऊ लागल्या. जगभरातील सर्वोच्च असे पुरस्कार त्यांच्या कार्यासाठी बहाल केलेले आहेत. भारतरत्न हा किताब देऊन भारत सरकारने भारतीय म्हणून त्यांचा उचित गौरव केलेला आहे. रोमन कॅथॉलिक परंपरेने त्यांना धन्यवादित म्हणून 2003 साली जाहीर केले. त्यांचे मानवतावादी कार्य, आजाऱ्यांना लाभलेले आरोग्य, मरणासन्न अवस्थेतील लोकांसाठी सन्मानाने मरण्याची जागा प्राप्त करून दिल्याबद्दल आणि 5 सप्टेंबर 1997 या दिवशी ख्रिस्तवासी झाल्यानंतरही त्यांच्या केवळ स्मरणाने स्वत:चे जीवन सुंदर बनल्याची साक्ष अनेकांनी दिली. ते मान्य होऊन त्या धन्यवादित झाल्या. त्यानंतर तेरा वर्षांनी, म्हणजे 2016 साली पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमधून मदर तेरेसा यांना कोलकात्याची संत म्हणून जगजाहीर केले.

          भारतीय ख्रिस्ती महिला संतांनीदेखील परमेश्वराशी संवाद साधलेला आहे. त्याच्याशी एकरूपत्व साधलेले आहे. संत सिस्टर आल्फोन्सा आणि संत सिस्टर युफ्रेसिया यांनी पारंपरिक प्रार्थनेतून संवाद साधलेला आहे, तथापि कोलकात्याच्या संत मदर तेरेसा यांनी त्यांच्या सेवाभावी कृत्यांतून आणि शब्दांतूनदेखील देवाशी अन् माणसांशी, समूहाशी संवाद साधलेला आहे. त्यांच्या सेवाकृत्यांच्या साक्षी म्हणजे त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या आणि जगभर पसरलेल्या धर्मभगिनी, त्यांनी उभारलेली अनाथालये, शेवटच्या घटका मोजणाऱ्या, मृत्यूच्या काठावर उभ्या राहिलेल्या लोकांसाठी बांधलेले निवारे,कुष्ठरोग्यांसाठी असलेली आश्रयस्थाने ! संत मदर तेरेसा यांनी वेळोवेळी केलेली भाषणे, लोकांशी साधलेला संवाद, प्रसारमाध्यमांनी दिलेली प्रसिद्धी, त्यावेळी झालेल्या मुलाखती, सर्व लिखित स्वरूपात आणि दृकश्राव्य माध्यमातून संग्रहित आहेत. शिवाय त्या त्यांच्या साऱ्या नोंदी टिपूनही ठेवत होत्या. त्यामुळे त्यांचा परमेश्वराशी चाललेला संवाद, त्यांचे चमकदार विचार उपलब्ध होऊ शकतात. शब्दरूप असलेला असा ठेवा त्या संतांच्या स्मृती जागवण्याचे आणि प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे काम करतात.

सिसिलिया कार्व्हालो9422385050 drceciliacar@gmail.com

सिसिलिया कार्व्हालो या मराठी कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ललितगद्य कथा, आस्वादनपर, संशोधनात्मक, चरित्रपर, अनुवाद अशा सर्व प्रकारच्या लेखनावर त्यांच्या ललितरम्य लेखनशैलीची मुद्रा उमटवली आहे. त्यांच्या ललितगद्य लेखनास अनंत काणेकर, पु.ल.देशपांडे आणि मधुकर केचे यांच्या नावांचे राज्यशासनाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर साहित्याचे अध्यापन केले आहे. त्या पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी बालभारती, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक कार्यात योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून केलेले कार्य संस्मरणीय आहे. त्यांनी मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील विभागीय साहित्य संमेलनांचेही अध्यक्षपद भूषवले आहे.

———————————————————————————————————————————————————–

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here